शेती कर्ज विभागा अंतर्गत विविध योजनेव्दारे करण्यात येणारे कर्जवाटप
१) किसान क्रेडीट कार्ड योजने अंतर्गत पिक कर्ज वाटप धोरण :-
     १) किसान क्रेडीट कार्ड योजने अंतर्गत रुपये 3.00 लाखापर्यन्त पीककर्ज 6% व्याज दराने केले जाते. शेतकरी सभासदाना दरवर्षी रब्बी व खरीप पीक कर्जांचे वाटप जमिनीचे क्षेत्र व चालू वर्षाचा पीकपेरा विचारात घेऊन बँकेशी सलंग्न विका / सेवा सहकारी संस्था मार्फत करण्यात येतो यात दरवर्षी शेतकरी सभासदाकडील मागील येणे कर्जबाकीचा भरणा केल्यानंतर त्यांना 20% वाढीव कर्जवाटप करण्यात येते.
     २) सदरील कर्जवाटप हे प्रामुख्याने कमीत कमी ½ एकर ते 25 एकर पर्यतचे जमिनीचे क्षेत्रावर मंजूर मर्यादेस अधिन राहून केले जाते.
     ३) सदर कर्जाची उचल करून त्याची वेळेत परतफेड करणाऱ्या कर्जदार सभासदास केंद्र शासनाकडून 3% व राज्य शासनाकडून डॉ. पंजाबराव देशमुख व्याज प्रोत्साहन योजनेंतर्गत 3% व्याज परतावा असे एकून 6% व्याज अनुदान शेतकरी सभासदांना मिळत असल्यामुळे सदरील कर्ज शेतकरी सभासदांना 0% व्याज दराने प्राप्त होत आहे.
     किसान क्रेडीट कार्ड योजने अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मागील तीन वर्षात पुढील प्रमाणे पिक कर्जाचे वाटप करण्यात आलेले आहे.
वर्ष |
सभासद संख्या |
जमिनीचे क्षेत्र |
केलेले कर्जवाटप |
2022-23 |
58504 |
49880.30 |
45433.96 |
2023-24 |
58728 |
50070.46 |
45572.14 |
2024-25 |
54654 |
54497.72 |
44257.74 |
2) प्रक्रिया संस्थाचे भाग (share) खरेदी करण्यासाठी मध्यम मुदती कर्जवाटप धोरण :-
     १) शेतमालावर प्रक्रिया करणाऱ्या कारखान्याचे (साखर कारखाना) भाग (share) खरेदी करू इच्छीणाऱ्या शेतकरी सभासदांना संबधित साखर कारखान्याच्या वसुलीस सहकार्य करणेच्या अटीवर शेतकरी सभासदांना संबधित विका / सेवा सहकारी संस्थेमार्फत रु. 15000/- पर्यंतचे 3 वर्ष मुदतीचे मध्यम मुदती कर्जवाटप द.सा.द.से. 13% व्याज दराने करण्यात येते.
     २) यासाठी शेतकरी सभासदाकडे किमान 1.00 हेक्टर सिंचनाखालील जमिनीचे क्षेत्र असणे आवश्यक आहे तसेच सभासदास त्यांचेकडे असलेल्या उसाचा लागवड दाखला संबधित कारखान्याकडून घेऊन बँकेस द्यावा लागेल. तसेच तो थकबाकीदार सभासद नसावा.
     या अंतर्गत बँकेने एकूण 31 संस्थेच्या 441 सभासदांना रुपये 68.92 लाख इतक्या रकमेचे कर्जवाटप केलेले आहे.
3) केंद्र शासनाच्या “सहकार से समृद्धी” धोरणानुसार प्राथमिक सेवा सहकारी संस्थाना खेळत्या भांडवलासाठी द्यावयाचे कॅश क्रेडीट कर्जधोरण :-
     १) बँकेमार्फत नव्यानेच केंद्र शासनाच्या “सहकार से समृद्धी” धोरणानुसार बँकेशी संलग्न ज्या विका / सेवा सहकारी संस्थाना बहुउद्देशीय विविध व्यवसाय करावयाचा आहे त्यांना खेळते भांडवलासाठी रुपये 5.00 लाखांचे कॅश क्रेडीट कर्ज बँकेमार्फत सदर धोरणाप्रमाणे उपलब्ध करून देण्यात येत आहे.
     २) यासाठी संस्थेकडील स्थावर मालमत्तेवर रु.5.00 लाखाचा बोजा नोंदवून गहाणखत करून देणे संस्थेस बंधनकारक आहे. सदरील कर्जवाटप संस्थेस 11.50% दराने उपलब्ध करून देण्यात येत आहे.
     ३) यासाठी संस्थेकडे अनिष्ट तफावत व बँक पातळीवर थकीत कर्ज असू नये. याअंतर्गत संस्थेस रु. 5.00 लाखापर्यंत भरणा / उचल सतत वर्षभर करता येतो.
     सदर कर्ज हे 1 वर्ष मुदतीचे असून दरवर्षी सदर कर्जाचे नुतनीकरण करणे आवश्यक आहे.
     या अंतर्गत सेवा सहकारी संस्था मर्यादित पळसा ता. हदगांव या संस्थेस रु.5.00 लाखांचे कॅश क्रेडीट कर्ज वाटप करण्यात आलेले आहे.
4) केंद्र शासनाच्या “सहकार से समृद्धी” योजना अंतर्गत विका / सेवा सहकारी संस्थाना गोदाम बांधकामासाठी (Grain Storage ) करावयाचे दीर्घ मुदती कर्जवाटप धोरण :-
     १) देशाचे मा. पंतप्रधान यांच्या “सहकार से समृद्धी” धोरणानुसार नवीन स्थापन झालेल्या सहकार मंत्रालयामार्फत जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक योजना राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात राबवण्यात येत असून यामुळे ग्रामीण भागातच धान्य साठवणूक विकेंद्रित होण्यास मदत होणार आहे.
     २) सदर धोरणानुसार बँकेशी संलग्न असलेल्या ज्या विका / सेवा सहकारी संस्थाना गोदाम बांधकाम करावयाचे आहे त्या संस्थेने त्यांची स्थावर मालमत्ता बँकेस बोजा नोंदवून गहाणखत करून दिल्यास त्या संस्थेस गोदाम बांधकामासाठी संस्थेकडील स्थावर मालमत्तेच्या शासकीय मुल्यांकणाच्या 60% पर्यंत कर्जवाटप 7 वर्ष मुदतीचे करण्यात येते.
     ३) या धोरणानुसार बँकेने विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था म. हिमायतनगर या संस्थेस द.सा.द.से. 4% दराने रु. 115.50 लाख रुपयांचे कर्ज मंजुरी केली आहे.
     ४) या कर्जवाटपासाठी प्रामुख्याने संस्थेकडे अनिष्ट तफावत नसावी. तसेच संस्था बँक पातळीवर थकबाकीत नसावी या अंतर्गत उचल केलेल्या कर्जावर संस्थेस शासनाकडून 3% प्रमाणे व्याज अनुदान प्राप्त होत असल्यामुळे सदरील कर्जवाटप हे केवळ 1% दराने संस्थेस उपलब्ध होत आहे. यासाठी गोदाम बांधकामाचा DPR मंजूर असणे आवश्यक असून MOU करार झालेले असणे आवश्यक आहे.
5) सोलार ऊर्जा निर्मिती संच उभारणीसाठी करावयाचे मध्यम मुदती कर्जवाटप धोरण :-
     १) देशातील वाढती विजेची गरज लक्षात घेता विका / सेवा सहकारी संस्था, त्यांचे सभासद तसेच बँकेस सलंग्न पगारदार पतसंस्था त्यांचे सभासद, बिल्डर्स व व्यक्तिगत सभासदांना घरी किंवा शेतात सोलार उर्जा निर्मिती संच उभारणीसाठी आर्थिक अडचण विचारात घेऊन दयावयाचे मध्यम मुदती कर्जवाटप धोरण बँकेने नव्याने जाहीर केले आहे.
     २) या अंतर्गत रु. 10.00 लाख किंवा प्रकल्प खर्चाचे 75% यापैकी कमी असेल ती रक्कम सभासदाची परतफेड क्षमता विचारात घेऊन सभासदास 13% व्याज दराने 5 वर्ष मुदतीचे सदरील कर्ज वाटप करण्यात येते. यासाठी सभासदाकडे किंवा संस्थेकडे RCC बांधकाम केलेले घर / कार्यालय असणे आवश्यक आहे.
     ३) यासाठी सभासदांना त्यांच्या कडील संपूर्ण जमिनीचे ईकरारपत्र देऊन घर / कार्यालय किंवा जमिनीवर बँकेचे नावाने बोजा निर्माण करून द्यावा लागेल. यासाठी सभासदाकडे किमान 5 एकर बागायत जमीन असणे आवश्यक आहे.
6) विका / सेवा सहकारी संस्थांचे सभासदांना संस्था मार्फत दीर्घ मुदती ट्रॅक्टर ट्रॉली व इतर साहित्य खरेदीसाठी करावयाचे कर्जवाटप धोरण :-
     १) जिल्ह्यातील कृषि क्षेत्रातील होणारे बदल व त्यानुषंगाने यांत्रिकीकरणांची आवश्यकता लक्षात घेऊन शेतकरी सभासदांना विका / सेवा सहकारी संस्थामार्फत दीर्घ मुदती ट्रॅक्टर, ट्रॉली व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी बँकेमार्फत कर्जवाटप करण्यासाठी दीर्घ मुदती ट्रॅक्टर कर्जवाटप धोरण नव्यानेच सुरु करण्यात आलेले आहे.
     २) यासाठी शेतकरी सभासदांकडे प्रामुख्याने 5 एकर बागायत जमीन किंवा 8 एकर जिरायत जमीन लागवडी खालील असणे आवश्यक आहे. सदरील कर्जवाटप सभासदांना 13% व्याज दराने उपलब्ध होणार आहे.
     ३) सदर कर्ज कोटेशनच्या 75% पर्यंत व जास्तीत जास्त रु.12.00 लाखापर्यंत कर्ज वाटप केले जाणार आहे. यात सभासदास ट्रॅक्टर, ट्रॉली व इतर साहित्य खरेदी करता येणार आहे. यासाठी संस्थेकडे अनिष्ट तफावत व बँक पातळीवर थकबाकी नसावी.
     ४) तसेच संस्थेकडील वसुली ही 65% पेक्षा कमी नसावी कर्ज मागणी करणारा सभासद अथवा त्याचे कुटुंबात कोणीही थकबाकीदार असू नये.
     वरील सर्व धोरणानुसार कर्ज उचल करण्यासाठी आवश्यक भागधारणा रक्कमेचा बँक भरणा सभासदास करावा लागणार आहे.